![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjWRPPT4fl08L6D614mmy-RA467gQZKRCDEr4jwl2LbifzT9yH5TEnefQbKXzL9KSBCqamYVPpyXXZbNoSFm_qK6qMzal7xUorejupEUM2ROYnJZs0xZ4V3CWb1DAGePHfQcjsP1_RRc-k/s320/raj.jpg)
राज ठाकरे ( जन्म १४ जून १९६८) हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या राजकीय पक्षाचे संस्थापक आहेत. शिवसेनेचे प्रमुख बाळ ठाकरे यांचे ते पुतणे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचे धोरण महाराष्ट्र व मराठीभाषा यांभोवतीच प्रामुख्याने केंद्रित ठेवले आहे. राज ठाकरे यांनी २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात नव्याने येत असलेल्या बिहारी व उत्तरप्रदेशी लोकांच्या लोंढाला आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले, त्यामुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवर्यात राहिले.
वैयक्तिक
राज ठाकरे (खरे नाव स्वरराज) यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी झाला. त्यांचे वडील श्रीकांत सीताराम ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे लहान बंधू होत. त्यांची आई कुंदा ठाकरे ह्या बाळ ठाकरे यांच्या पत्नी कै. मीना ठाकरे यांची बहीण लागतात. आहे. राज ठाकरे यांचे बालपण मुंबईच्या दादर भागात गेले. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयात झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये झाले. राजचे वडील कै. श्रीकांत ठाकरे हे संगीतकार होते. राज ठाकरे आपले काकांप्रमाणे व्यंग्यचित्रकार आहेत. वॉल्ट डिस्ने हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. राजकारणात नसते तर नक्कीच वॉल्ट डिस्नेसारखे कार्टूनपट करणे आवडले असते असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच चित्रपट निर्मिती व फोटोग्राफी यातही राज ठाकरे यांना रस आहे.
शर्मिला ठाकरे ह्या राज ठाकरे यांच्या पत्नी असून, एक मुलगा व एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.
राजकीय वाटचाल
शिवसेना
ठाकरे कुटुंबात जन्मल्यामुळे लहानपणापासूनच राज ठाकरे यांना बाळ ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. ते अजूनही बाळ ठाकरे यांना आपले दैवताचे स्थान देतात. आपली राजकीय कारकीर्द त्यांनी शिवसेनेतच सुरू केली. उमदे प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून राज ठाकरे यांनी स्वतःला समर्थकांचा मोठा पाठिंबा मिळवला, असे दिसते आहे.[ शिवसेनेला तरुणांचा बळकट पाठिंबा मिळ्वण्यात राज ठाकरे यांचा वाटा महत्त्वाचा समजला जातो. बाळ ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सूत्रे कोण वाहणार यावर एके काळी राज ठाकरे याच्याकडेच बोट दाखवले जायचे. शिवसेनाप्रमुखांनी कार्यध्यक्षपदी आपले पुत्र उद्धव ठाकरे यांची नियुक्ती केली त्यामुळे राज ठाकरे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष झाला. राज ठाकरे यांना डावलल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती. इ.स २००६, च्या मार्च महिन्यात शिवसेनेमध्ये आपल्याला व आपल्या समर्थकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याच्या कारण सांगून राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला व काही दिवसांतच शिवसेना पूर्णपणे सोडत असल्याची घोषणा केली. तसेच महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक परिस्थिती सुधारण्याचे व महाराष्ट्रात मराठी भाषेची पत ढळू दिली न जाता तिची उन्नती करण्याचे प्रयत्न करीन, अश्या प्रकारचा राज ठाकरे यांच्या सुरुवातीच्या भाषणांचा सूर होता.
उत्तरप्रदेशी व बिहारी लोकांवरील टीका-
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये मुंबईमध्ये येणार्या लोंढ्यांवर लक्ष वेधले, मुंबई अगोदरच बकाल झाली असून हे लोंढे असेच येत राहिल्यास परिस्थिती अजून बिघडेल, असा इशारा देत त्यांनी उत्तर प्रदेशी व बिहारी लोकांवर आपला शाब्दिक हल्ला चढवला. त्यांच्या राज्यांतील राजकारण्यांमुळे त्या राज्यात रोजगार निर्माण झाला नाही, आणि त्यामुळे तेथील नागरिक सर्व भारतभर रोजगार शोधत फिरतात. त्यांतील सर्वांत जास्त लोंढा महाराष्ट्रात व मुंबईत येतो. त्या राज्यांच्या नाकर्तेपणाचा महाराष्ट्रातील जनतेने का भुर्दंड भरावा? असा सवाल करत तेथील राजकारण्यांवर टीका केली. लालूप्रसाद व पासवान यांच्या भाषणांचा दाखला देत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आहे असा राजकीय आरोपही त्यांनी केला. बाहेरच्या राज्यातील नागरिक महाराष्ट्रात येऊन येथील स्थानिक लोकांच्या नोकर्यांच्या संधी कमी करतात. परंतु बिहारी व उत्तरप्रदेशी नागरिक महाराष्ट्रात येउन येथील सामाजिक वातावरणही गढूळ करतात असा आरोप करत, हे नागरिक महाराष्ट्रात येऊन मराठी शिकत नाहीत, त्यांच्याशी बोलताना हिंदीतच बोलावे लागते हा सर्वसामान्य लोकांच्या अनुभव आहे असे सांगत त्यांनी मराठी भाषकांची भाषिक अस्मिता जागृत करण्याचा प्रयत्न केला. जपान, फ्रान्स, जर्मनी या देशातील तसेच तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यातील भाषाप्रेमाचे दाखले देत, ह्या देशांत तसेच राज्यात बाहेरून नागरिक आला तर त्याला स्थानिक भाषा शिकावीच लागते. फक्त, उत्तर प्रदेशी व बिहारी नागरिक येथील भाषा का शिकत नाहीत? येथील मराठी संस्कृतीत सामील होत नाहीत व उलटे मराठीला हीन लेखत त्यांच्या राज्यातील कुप्रसिद्ध गुंडशाही येथे आणतात. अशा प्रकारची आरोपवजा टीका राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांतून व मुलाखतींतून स्पष्टपणे केली.
मनसे व उत्तर भारतीयांविरुद्ध दंगे
३ फेब्रुवारी २००८ रोजी मनसेचे कार्यकर्ते व समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते यांच्यात संघर्षाची ठिणगी उडाली. मुंबईत अनेक ठिकाणी चिकटवलेली भित्तिपत्रे (युपी बिहार तो हमारा है| अब कि बारी बंम्बई है|) व समाजवादी पक्षाची प्रक्षोभक भाषणे हे कारण ठरले. राज ठाकरे यांनी दरम्यान अमिताभ बच्चन यांच्यावरही टीकास्त्र सोडले. सामाजिक कार्यासाठी ते आपले मूळ राज्याचीच निवड करतात व ज्या राज्यात त्यांची कारकीर्द घडली त्या राज्यात सामाजिक कार्य करताना हात आखडता घेतात. या वेळेस मुंबईतील अनेक टॅक्सींची तोडफोड करण्यात आली.
फेब्रुवारी १३ २००८ रोजी राज्य सरकारला या प्रकरणी ढिलाई दाखवल्याची टीका सहन करावी लागली व काहीतरी करायचे म्हणून राज ठाकरे व समाजवादी पार्टी चे अबू आझमी यांना अटक करण्यात आली. जरी दोघांना त्याच दिवशी सोडण्यात आले तरी कोणत्याही प्रकारची वक्तव्ये करण्यास बंदी घालण्यात आली. या अटकेचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची निदर्शने झाली व उत्तर प्रदेशी व बिहारी नागरिकांवरील रोष अजून वाढला व अनेक ठिकाणी मारहाण करण्यात आली. परिणामी अनेक ठिकाणांवरून उ.प्रदेश व बिहार मधील कामगार आपापल्या गावी पळून गेले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कामगारांचा तुटवडा निर्माण झाला. या घटनेनंतरही लहान सहान घटना घडत राहिल्या. कामगारांच्या तुटवड्यावर उपाय म्हणून मनसे ने कामगार भर्तीसाठी बेरोजगार मराठी तरुणांना कामास ठेवावे अशी विनंती अनेक उद्योग व बांधकाम व्यावसायिकांना केली.अनेक जिल्ह्यात मराठी तरुणांसाठी अर्ज नोंदणी मेळावे आयोजित करण्यात आले.
ऑक्टोबर मध्ये मराठी उत्तर भारतीय वादाला नव्याने तोंड फुटले. या वेळेस कारण ठरले ते पश्चिम रेल्वे कर्मचारी भरती परीक्षा. पश्चिम रेल्वेच्या परीक्षा मनसे व शिवसेनेने उधळून लावल्या व आलेल्या उत्तर भारतीय परिक्षार्थींना पळवून लावण्यात आले. मनसे व शिवसेनेने या पश्चिम रेल्वेच्या भर्तीसाठी बिहारी परिक्षार्थींचीच का निवड करण्यात आली तसेच महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात परीक्षेची जाहिरात न देण्यास कारण काय?’महाराष्ट्रातील मराठी वर्तमानपत्रांतून जाहिराती न देण्याचे धोरण फार पूर्वीपासून आह” असे लालू प्रसाद यांनी ठणकावून सांगितले. या घटनेनंतर प्रक्षोभक भाषणे केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांना रत्नागिरी येथे अटक करण्यात आली व मुंबईस आणण्यात आले. परंतु या काळात उत्तर भारतीयांविरुद्ध होणारा दंगा बळावला व मुंबई नंतर महाराष्ट्रातील अनेक भागात पसरला. या काळात हिंदी प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. लालूप्रसाद व नितीशकुमार या बिहारी नेत्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना या प्रकरणी मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्याप्रमाणे मनमोहनसिंग यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास सांगितले. राज ठाकरे यांच्यावर एकूण ८४ विविध प्रकारचे गुन्हे दाखले करण्यात आले. मनसे च्या कार्यकर्त्यांची अनेक ठिकाणी धरपकड करण्यात् आली. बिहारमध्येही यावर प्रतिक्रिया म्हणून काही ठिकाणी रेल्वे डबे जाळण्यात आले, व एक आगगाडी पळवून नेण्यात आली. दिल्लीमधील महाराष्ट्र सदन च्या कार्यालयावर हल्ला करून मोडतोड करण्यात् आली.
या घटनेनंतर नारायण राणे, छगन भुजबळ, यासारखे काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेते यांनी राज ठाकरे यांच्या आंदोलनाला शाब्दिक पाठिंबा दिला व त्यांचे आंदोलन रास्त असल्याचे मत व्यक्त केले परंतु राज ठाकरे यांच्या हिंसक आंदोलनाच्या मार्गावर टीका केली. शोभा डे या मान्यवर लेखिकेने देखील आय.बी.एन या वाहिनीवर डेव्हिल्स ऍडव्होकेट या कार्यक्रमात राज ठाकरे यांचे आंदोलन रास्त असल्याचे मत व्यक्त केले . प्रसारमाध्यमांनी देखील राज ठाकर्यांची भूमिका व मराठी भाषकांचे मत समजून न घेता पक्षपाती टीका करण्याचा बेजवाबदारपणा दाखवला असे त्यांचे मत होते.( बिहारमधील रेल्वे जाळणारे ते विद्यार्थी आणि व महाराष्ट्रात आंदोलन करणारे करणारे ते मनसेचे गुंड असा पक्षपाती प्रचार बिहारी आणि उत्तरप्रदेशी नेत्यांनी केला.
No comments:
Post a Comment